महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास नॅक (NAAC) चे "B" नामांकन प्राप्त
कोल्हापूर ता.20 : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास यावर्षी नेटचे " B" नामांकन प्राप्त झाले आसून, यापूर्वी या महाविद्यालयास 2005 मध्ये " C++" तर सन 2016 मध्ये "C " नामांकन मिळाले होते. यावेळी महाविद्यालयास पायाभूत सुविधा पूरविताना कॉलेजमधील स्वच्छता गृहांची दुरुस्ती, रंगरंगोटी, सुशोभीकरण, साफसफाई, वॉटर प्युरिफायर, सुविधा, स्वतंत्र संगणक कक्ष, व फ्लेक्स ई. सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम, शिवाजी विद्यापीठांतर्गत प्रथमच ग्रीन ऑडिट, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक शिबिरे, विद्यार्थिनींसाठी मोफत बस पासची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. के.एम.सी. कॉलेजला प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी प्रत्यक्ष वेळोवेळी भेट देऊन पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी सोयी सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या होत्या.त्या सर्व सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हे स्थानिक स्वराज्य संस्था संचलित पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज असून या महाविद्यालयामध्ये आर्ट्स व कॉमर्स विषयांचे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय सुरू आहे. या महाविद्यालयात अत्यंत तळागाळातील मुलांना प्रवेश दिला जातो. या ठिकाणी आलेल्या मुलांना माफक शुल्कामध्ये शैक्षणिक सुविधा महाविद्यालयामार्फत पुरविल्या जातात. महाविद्यालयाची स्वतःची प्रशस्त लायब्ररी असून महापालिकेच्या अन्य वाचनालय व अभ्यासिकांचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. महाविद्यालयाची प्रशस्त इमारत आणि अनुभवी शिक्षक वर्ग यामुळे या महाविद्यालयास एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. विज्ञान शाखा तसेच कौशल्य शिक्षणावर आधारित प्रशिक्षण वर्ग या महाविद्यालयात पुढील कालावधीत सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पुढच्या वर्षी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयास निश्चितपणे "A+" मानांकन मिळवण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न राहील असे विश्वास अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी व्यक्त केला आहे.